अनलॉकनंतर बससेवा सुरू झाल्या आहेत. मात्र रेल्वे सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. केवळ नांदेड-अमृतसर आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस व परभणी - हैद्राबाद एक्सप्रेस सध्या धावत आहेत. मात्र इतर रेल्वे केव्हा सुरू होणार याकडे प्रवाशांना प्रतीक्षा लागलेली आहे. अनेक प्रवाशी तर रेल्वे सुरू कधी होणार याची विचारणा करण्यासाठी रेल्वे स्थानकावर चकरा मारत आहेत.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यात दुसरीकडे हळूहळू सर्व खुले करण्यात येत आहेत. त्यामुळे हळूहळू अनेक क्षेत्र पूर्वपदावर येत आहेत. बससेवा देखील सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देखील देण्यात आली आहे. परंतु रेल्वेला मात्र अजूनही ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे अनेकांची कामे थांबलेले आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास प्रवाशी करू शकत नाही. त्यामुळे रेल्वे सुरू कधी होणार? याची विचारणा करण्यासाठी काही प्रवाशी रेल्वे स्थानकावर देखील चकरा मारत आहेत.